राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ११ : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे  इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबनासाठी आणि महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह वाहन क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो, पण आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हे सुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. राज्यात मागील एका वर्षात आपत्तीग्रस्तांना १३ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात पर्यावरणातील बदलांमुळे येणाऱ्या अशा आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पुढील ५ वर्षात राज्यात इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

एसटीमध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या वापराला चालना – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले की, आपल्याला ई-मोबिलीटीवर जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वीजेची गरज भासणार आहे. पण विजेची गरज भागवताना ती हरित ऊर्जा कशी असेल यावर लक्ष द्यावे लागेल. एसटीमध्ये सध्या इंधनावर सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. पण इलेक्ट्रिक बसेस वापल्यास या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या एसटी संकटात असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी ‘गो ग्रीन’कडे वळणाशिवाय पर्याय नाही. याअनुषंगाने येत्या काळात एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेसच्या वापराला चालना देण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी सांगितले.

पर्यावरण राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरातून आपण शून्य प्रदुषणाकडे वाटचाल करणार आहोत. एकूण प्रदुषणातील वाहनांपासून होणारे प्रदूषण हे सर्वाधिक आहे. हे पाहता यापुढील काळात प्रदुषणाचा वाढता स्तर रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना पर्याय नसेल. मागील काळात आपण मुंबईतील टॅक्सी, रिक्षा, बसेस सीएनजीवर परावर्तीत करु शकलो. यापुढील काळात शून्य उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री.श्रीवास्तव म्हणाले की, शहरांमधील हवेचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. एकूण प्रदुषणापैकी २५ टक्के वाटा हा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे. हे रोखण्यासाठी आपल्यालाही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळाले लागेल. पण हे करताना याबरोबरच आपल्याला हरित उर्जेकडे वळावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्याची वेळ आली आहे. यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आली आहे. देशात सुमारे ८० टक्के वाहने ही दुचाकी आहेत. यापुढील काळात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या वापरास प्राधान्याने चालना देता येईल. तरुणांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांविषयी कुतुहल निर्माण होईल व ते याचा वापर करतील यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. सिंह यांनी मुंबईत मागील काही दिवसात खराब झालेल्या हवेच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त केली. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याशिवाय महानगरांमधील हवेचे प्रदूषण आपण रोखू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत दिवसभर झालेल्या चर्चेत टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, ओलेक्ट्राचे शरथ चंद्रा, टीव्हीएस मोटार्सचे कमल सूद, उबेरचे महादेवन नंबियार, युलुचे श्रेयांश शहा, ॲम्बिलिफी मोबिलीटीचे चंद्रेश सेठीया, व्हीजन मेकॅट्रॉनिक्सच्या राशी गुप्ता, ऑक्टीलियन पॉवर सिस्टीम्सचे यशोधन गोखले, युमिकोअरचे केदार रेले आदींनी सहभाग घेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना देण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!