दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील ‘सासकल’ हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे राजे गटाचे पारंपरिक गाव असून सत्तारूढ गट व विरोधी गट हे दोन्ही गट राजे गटाचे समर्थक होते. मात्र, सद्य:स्थितीमध्ये राजकारणाचा खालावलेला पोत आणि वरिष्ठ नेत्यांच्या दोलायमान व अस्पष्ट राजकीय भूमिकेमुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नेमकं कोणाच्या बाजूला जावे, हे समजेना. अशा परिस्थितीमध्ये खासदार गट म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वाड्या वस्त्या पिंजून काढत असून त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकृष्ट होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहे. माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये सासकल गावचे उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, कमलाकर आडके, ज्ञानेश्वर मुळीक, अजित मुळीक, मंगेश मदने, विनायक मदने यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेशावेळी अनुप शहा हेही उपस्थित होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गावच्या विधायक विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन तरुण कार्यकर्त्यांना दिले.