
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातार्यातील गोडोली चौकात नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवून पाच टपर्या जप्त केल्या. रस्त्याला अडथळा ठरणारे दुकानांचे फलक आणि साहित्य कटरच्या साह्याने कापून ताब्यात घेतले. पूर्वसूचना आणि नोटीस देऊनही अतिक्रमण न हटविणार्या टपरीधारकांवर पथकाने ही कारवाई केली.
गोडोली चौक हा कोल्हापूर व रहिमतपूरकडे जाणारा मुख्य मार्ग असून, परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने येथे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद होऊन नियमित वाहतूककोंडी होत होती. या समस्येचे निरसन करण्यासाठी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी चौकाची पाहणी करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार नोटीस बजावल्यानंतर सोमवारी अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्या कारवाईला सुरुवात केली. नोटीसनंतर काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली, तर दुर्लक्ष करणार्यांच्या टपर्या जप्त करण्यात आल्या. पालिका प्रशासनाकडून ही मोहीम यापुढेही सातत्याने राबवली जाणार आहे.
