माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी पूर्ण


दैनिक स्थैर्य | दि. ५ मे २०२४ | फलटण |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ४३ माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

४३ माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या पुढीलप्रमाणे –

स्त्रिया – १६३९३९
पुरूष – १७२०४६
इतर – १४
एकूण – ३३५९९९

मतदान केंद्रांची संख्या – ३४१

प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ४ मतदान अधिकारी व १ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर १ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. ४३ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये राखीव अधिकारी/कर्मचारी यांच्यासह एकूण २६२५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दि. ७ मे २०२४ रोजी होणार्‍या मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना दि. ६ मे २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता शासकीय धान्य गोदाम, अधिकार गृहासमोर, फलटण या ठिकाणी बोलविण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण १७ टेबलवरून साहित्य वाटपाचे काम करण्यात येणार आहे. तसेच २ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत.

मतदान साहित्य संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या ताब्यात दिल्यानंतर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांना एस.टी. बसेस व इतर वाहनाने मतदान केंद्रावर पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ५१ एस.टी. बसेस व ३ जीपद्वारे सर्व अधिकारी व कर्मचारी एकूण ३४१ मतदान केंद्रांवर पोहोच करण्यात येणार आहे.

४३ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये असणार्‍या सर्व ३४१ मतदान केंद्रांची स्वच्छता मागील दोन-तीन दिवसांपासून करण्यात आलेली आहे. तसेच मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था स्थानिक बचतगटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

तसेच दि. ५ मे २०२४ रोजी पहाटे ५.०० वाजल्यापासून मध्यवर्ती निवडणूक कक्षामध्ये मतदान केंद्रावरील ई.व्ही.एम. मशीन्स व व्ही.व्ही. पॅटमध्ये येणार्‍या तांत्रिक बिघाडाचे निराकरण करण्याकामी १३ तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ व्यक्तींचे पथक तैनात करण्यात आले आहे.

दि. ७ मे रोजी मतदानाची दर दोन तासांची आकडेवारी संकलित करणे व त्याची डाटा इंट्री करण्यासाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत.

तसेच दि. ७ मे रोजी मतदान संपल्यानंतर सर्व ३४१ मतदान केंद्रावरील मतदान साहित्य जमा करून घेण्यासाठी एकूण २३ टेबल ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलवर १५ मतदान केंद्राची स्वीकृती करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आलेली आहे. तसेच अधिकारगृह परिसर व शासकीय धान्य गोदाम परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!