एकनाथ शिंदेंचा फलटण दौरा रद्द; साखरवाडीतील सभेला आता उदय सामंत येणार; अजितदादांच्या निधनामुळे घेतला निर्णय


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा फलटण दौरा रद्द. अजित पवार यांच्या निधनामुळे साखरवाडीतील नियोजित सभा रद्द झाल्याची चर्चा, मात्र उद्योगमंत्री उदय सामंत येण्याची शक्यता. वाचा सविस्तर अपडेट…

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जानेवारी : फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आज (दि. ३१) आयोजित करण्यात आलेला शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फलटण दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे नुकतेच झालेले दुर्दैवी निधन आणि त्यामुळे निर्माण झालेली शोकाकुल परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

साखरवाडी (ता. फलटण) येथे आज सकाळी १० वाजता एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे गट प्रणित शिवसेनेची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने ही सभा रद्द झाल्याची माहिती मिळत असली, तरी या ठिकाणी आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे येणार नाहीत, पण ‘सामंत’ सांभाळणार धुरा?

खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे जरी आजच्या सभेला उपस्थित राहणार नसले, तरी निवडणुकीचा प्रचार आणि कार्यकर्त्यांचे मनोबल कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज फलटण दौऱ्यावर येत आहेत. ते साखरवाडी येथील कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

राजे गटाकडून जय्यत तयारी

या सभेसाठी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गटाने मोठी तयारी केली होती. मैदान आणि व्यासपीठ सज्ज करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत आता ही सभा उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार की त्याचे स्वरूप बदलणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

अजितदादांच्या निधनामुळे सध्या राज्यात राजकीय दुखवटा पाळला जात असून, अनेक मोठे नेते आपले नियोजित दौरे रद्द करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा रद्द केल्याचे समजते.


Back to top button
Don`t copy text!