दैनिक स्थैर्य | दि. 16 डिसेंबर 2023 | फलटण | शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याबाबतचा निर्णय शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये आमची पाल्य ही पूर्णतः शाकाहारी असून त्यांच्या पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करू नये; याबाबतचे निवेदन शाकाहारी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशालेच्या प्राचार्यांना देण्यात आले आहे.
फलटण येथील मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांना शाकाहारी पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आमचे पाल्य हे पूर्णतः शाकाहारी आहेत. आम्ही विद्यार्थ्यांचे पालक आहोत. आमचे पाल्य इ. ५ वी ते इ. ८ वी या वर्गामध्ये शिकत आहेत. आता नवीन निर्णयाच्या नुसार शालेय पोषण आहारामध्ये अंडी देणार आहेत; तर आमच्या सर्व शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडयाचा आहार देऊ नये; असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
सदर अंडयाच्या आहाराविवशी आमचे पाल्य शाळेत येवू शकणार नाहीत. सदर आहारा दिवशी होणाऱ्या शैक्षणिक अभ्यासाच्या नुकसानीस शासनाचे नियमानुसार शासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी. तसेच यापुढे शालेय पोषण आहारात ज्या भांड्यात भात व खिचडी हे पदार्थ शिजवले जाणार आहेत त्याच भांड्यात अंडयाचे पदार्थ शिजवले जाण्याची शक्यता असले कारणामुळे आमच्या मुलांना शालेय पोषण आहार खाण्यास व डब्यात घेण्यास सक्ती किंवा जबरदस्ती करू नये; असे सुद्धा निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
अंडी खाणाऱ्या मुलाबरोबर शाकाहारी मुलांचा एकत्रीत वावर शाळेत होत असतो. त्यामुळे शालेय आहारामध्ये अंडी न देता शाकाहारी पदार्थ म्हणजेच फळे, दूध, पनीर द्यावे; असेही पालकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
फलटण ही महानुभाव पंथीयांची व जैन बांधवांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाती. यासोबतच फलटणमध्ये वारकरी संप्रदाय व मारवाडी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे; त्यामुळे अश्या पाल्यांच्या घरामध्ये पूर्णतः शाकाहारी आहार खाल्ला जातो. त्यामुळे अंड्याचा समावेश करू नये; असे यावेळी पालक यांनी स्पष्ट केले.