ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२: पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचलनालय (ED) ने या प्रकरणात शनिवारी नवीन खुलासा केला. ईडीने शुक्रवारी शिवसेना नेते संजय राउत यांचे जवळचे असलेले प्रवीण राउत यांची 72 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आता प्रवीण राउत यांनी संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांना 55 लाख रुपये कर्जाच्या स्वरुपात दिल्याचा खुलासा केला. ही रक्कम प्रवीण राउत यांनी गैरव्यवहारातून मिळवली होती असा दावा ईडीने केला. एवढेच नव्हे, तर प्रवीण राउत यांच्या कंस्ट्रक्शन कंपनी ‘अवनी’ च्या त्या पार्टनर असल्याचे सुद्धा सांगितले आहे. प्रवीण यांनी त्यांच्या पत्नी माधुरी यांच्या खात्यातून 55 लाख रुपये वर्षा यांच्या खात्यात जमा केले होते. याच प्रकरणात वर्षा राउत यांची 5 जानेवारी रोजी चौकशी केली जाणार आहे.

55 लाखांचे बिनव्याजी कर्ज
ईडीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, तपासात हे देखील समोर आले आहे की प्रवीण यांनी आपल्या पत्नी माधुरी यांच्या खात्यात 1 कोटी 60 लाख रुपये जमा केले होते. मग त्यातून 55 लाख रुपये वर्षा राउत यांच्या खात्यात व्याजमुक्त कर्जाच्या स्वरुपात टाकले होते. याच पैशातून नंतर दादर परिसरात फ्लॅट विकत घेण्यात आला. वर्षा आणि माधुरी राउत ‘अवनी कंस्ट्रक्शन’ मध्ये पार्टनर आहेत असे ईडीने सांगितले आहे.

1993 मध्ये झाला होता विवाह
खासदार संजय राउत यांनी 1993 मध्ये वर्षा यांच्याशी विवाह केला होता. वर्षा राउत मुंबईतील भांडूप परिसरातील एका शाळेत शिक्षिका आहेत. राजकारणापासून दोन हात दूरच राहणाऱ्या वर्षा चित्रपट निर्मात्या म्हणूनही काम करतात. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘ठाकरे’ होता.

काय आहे पीएमसी प्रकरण
PMC बँकेत बनावट खात्यांच्या माध्यमातून एका विकासकाला 6500 कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास हा व्यवहार आला होता. तेव्हाच बँकेवर कडक निर्बंध लादण्यात आले. PMC बँक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना या प्रकरणात अटकही केली. PMC बँक बुडवण्यात जी 44 खाती महत्वाची होती त्यात 10 खाती HDIL ची होती.


Back to top button
Don`t copy text!