तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीनं तब्बल ९ तास चौकशी केली. आजची चौकशी संपल्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जयंत पाटील ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आज सकाळी साडे आठ वाजल्यापासून जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली होती. ही चौकशी तब्बल नऊ तासांहून अधिक काळानंतर रात्री साधारण नऊ वाजल्यानंतर संपली. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. यावेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, “ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपण दिली. इतक्या तासांमध्ये ईडीच्या कार्यालयात बसून माझे अर्ध पुस्तक वाचून झाले. ईडीकडे आता मला विचारायला कुठलेच प्रश्न शिल्लक नसतील”.

दरम्यान, जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काही वर्षांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती पाहता ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते.

जयंत पाटील यांच्यावर काय आहे आरोप?
2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कंत्राट संबंधित कंपनीला देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आले. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते.


Back to top button
Don`t copy text!