
थेट WhatsApp वर मिळवा
डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे पिकांची नोंदणी करू न शकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १५ नोव्हेंबर : मोबाईल ॲपमधील तांत्रिक त्रुटी आणि सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक शेतकरी वेळेत पिकांची नोंद करू शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या वतीने ई-पीक पाहणीसाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत शेतकऱ्यांना ग्राम महसूल अधिकारी स्तरावर ई-फेरफार प्रणालीद्वारे पिकांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणींमुळे घेतला निर्णय
डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) ॲपद्वारे नोंदणी करताना शेतकऱ्यांना विविध क्षेत्रीय आणि प्रादेशिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन महसूल शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता ज्या शेतकऱ्यांना ॲपवर नोंद करणे शक्य झालेले नाही, त्यांना ग्राम महसूल अधिकारी स्तरावर ई-फेरफार प्रणालीच्या माध्यमातून गावानमुना १२ मध्ये पिकांची नोंद करता येणार आहे.
दुबार नोंदी टाळण्याचे प्रशासनाला निर्देश
या विशेष प्रक्रियेदरम्यान कोणतीही दुबार पीक नोंद होऊ नये, यासाठी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुदतवाढीच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी निर्धारित मुदतीत आपली पिकांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





