चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथून सुप्रियाची बदली पुणे आयुक्तालयात झाली. आयुक्तालयात काम करताना तिला पुणे शहरात येणार्या सर्व व्हीआयपी, राजकीय व प्रशासकीय व्यक्तींचा बंदोबस्त लावण्याचे काम मिळाले. ते काम तिने अत्यंत प्रामाणिकपणे केले आणि त्यात तिला चारवेळा रिवार्ड मिळाली आहेत.
त्याच कालावधीत तिचे लग्न सागर शिंदे या उच्चशिक्षित, आयआयटी पवई, मुंबई येथून ‘एम टेक’ पदवी घेतलेल्या तरुणाशी झाले. दोघांचा संसार सुरू झाला. सासू – सासरे, पती यांचेबरोबर ती सकाळनगर, पुणे येथील सरकारी कॉर्टरमध्ये रहात असताना तेथेच त्यांना पहिले अपत्य झाले. नोकरी आणि लहान बाळ सांभाळणे, ही कसरत आणि तीही पोलीस खात्यातील नोकरी, याचा मेळ घालून करताना बाळाला पाळणा घरात ठेवले. त्यानंतर ‘प्ले ग्रुप’ मध्ये ठेवले. बाळाला नेऊन सोडायचे-आणायचे, ह्या सगळ्या वेळा पाळायच्या आणि पतीची नोकरी, आपली नोकरी आणि घरातील सासू – सासरे यांना सांभाळणे, अशी तारेवरील कसरत चालू होती; परंतु ती धीराने, न डगमगता त्याला तोंड देत होती. त्यानंतर तिची बदली खंडाळा महिला ट्रेनिंग सेंटर येथे झाली. खंडाळा महिला ट्रेनिंग सेंटर येथे अधिकार्यांची निवासस्थाने होती; परंतु सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी आणि मुलांना शिक्षण, या सगळ्या बाबींचा मेळ घालता येत नव्हता. त्यामुळे पुण्यावरूनच येऊन-जाऊन त्या ट्रेनिंग सेंटरला तिने ३ वर्षे काम केले. हजारो प्रशिक्षित महिला कॉन्स्टेबलला ट्रेनिंग दिले आणि आपल्या कामाचा वेगळा ठसा तेथे तिने उमटवला. हे सगळे चालू असताना तिच्या सासूबाई पूर्ण अंध झाल्या आणि तिच्या कामाची एक जबाबदारी वाढली. दुसर्या मुलाच्या वेळेला ह्या सगळ्या कसरती करत ती खंडाळा येथे येऊन-जाऊन करत होती. रोज सकाळी ५ वाजता उठून जायचे आणि रात्री १०-११ वाजता परत यायचे, असा नित्यक्रम होता. त्यातच दुसर्या अपत्याला जन्म दिला. करोना आणि सगळ्या अडचणींना तोंड देत जवळपास एक वर्ष रजा काढून या गोष्टीला सामोरे गेली. तितकीच धीरोदत्तपणे काम करीत राहिली.
त्यानंतर तिची आता बदली पुणे लोहमार्ग स्टेशन येथे झाली आहे. लोहमार्गावर घडणारे गुन्हे याबाबतचे काम तिला मिळाले आहे. या सर्व प्रवासात तिला स्वतंत्र पोलीस स्टेशनला नेमणूक मिळाली नाही, पण त्याची एक बाप म्हणून मी ज्यावेळेला कारणीमीमांसा केली, तेव्हा मला असे लक्षात आले की, तुम्हाला जर ‘गॉडफादर’ असेल तरच स्वतंत्र पोलीस स्टेशनला काम करण्याची संधी मिळते, अन्यथा साईड पोस्टिंग ठरलेली आहे. आपल्या अंगात कितीही चातुर्य असले, कितीही काम करून दाखवण्याची धमक असली तरी काम करण्याला संधीच मिळाली नाही तर काय करणार, ही एक माझ्या मनातली खंत मी इथे व्यक्त करीत आहे.
महिला पोलीस अधिकार्याचा बाप…
नाशिकमध्ये पोलीस अधिकार्यांची पासआऊट परेड होती. परेड सकाळी असलेने आम्ही रात्री नाशिकमध्ये मुक्कामीच गेलो होतो. हॉटेलवरून सकाळी लवकर उठून परेड ठिकाणी हजर झालो. परेडला सुरूवात झाली आणि आमची नजर सुप्रिया कुठे दिसते का याकडे होती, एक एक प्लाटून त्या मैदानात येत होती आणि परेड करून एका ठिकाणी स्थिर होत होती. एक प्लाटून मार्च करीत प्रेक्षक गॅलरीच्या समोरून जाताना आम्हाला त्यामध्ये सुप्रिया मार्च करताना दिसली. पोलीस अधिकार्याच्या गणवेशात तिला पाहून आमच्या सगळ्यांचे डोळे ओले झाले, मात्र तिचा रूबाब, चमचम करणारा तांबडा बूट, तांबडा बेल्ट आणि पितळी पॉलिश केलेली शर्टची बटणे ही लांबूनच आमची नजर त्या दिशेने आकर्षित करत होती आणि मनाला समाधानही देत होती. तीसुद्धा आपले आई – वडील प्रेक्षक गॅलरीत कुठे बसले आहेत, हे परेडमध्ये चालता-चालता न्याहळत होती. तिची नजरा नजर झाली आणि मी हात वर केला, पण तिला परेडमध्ये हात वर करता येत नव्हता, आम्ही समजून गेलो आणि त्यांचा प्लाटून एका ठिकाणी थांबला.
‘पासआऊट परेड’ ही प्रत्येक पोलीस अधिकार्याचा एक मानबिंदू आहे आणि त्या वर्षभर केलेल्या मेहनतीचे ते फळ आहे. यामध्ये प्रत्येक जण आपले सर्वस्व पणाला लावून परेड करत होता. परेडला प्रमुख पाहुणे यांना सलामी दिल्यानंतर एक एक प्लाटून पास आऊट गेटने बाहेर येत होता. प्रेक्षक गॅलरीतील सर्व नातेवाईक आता पास आऊट गेटच्या दिशेने जाऊ लागले आणि आपल्या मुला-मुलींना शोधू लागले. सुप्रिया पास आऊट गेटमधून बाहेर आली आणि समोर असलेल्या मैदानात आम्ही तिच्याभोवती उभे राहिलो. तिला पोलिस अधिकार्याच्या पोशाखात तिची आई, भाऊ, आजी पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे पुन्हा पुन्हा डोळे भरुन पाहत होते. पुन्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. आजीने तिच्या दोन्ही गालावरून हात फिरवून आपल्या कपाळावर बोटं मोडली आणि परत तिला मिठीत घेतली, असा हा सोहळा चालला होता.
ग्राउंडवर प्रत्येक पालक आपल्या मुलाला घेऊन आनंदाने हितगुज करत होता आणि सर्वांना घराकडे जाण्याची ओढ लागलेली होती. सुप्रियाने आदल्या दिवशीच सर्व साहित्य भरून ठेवलेले होते. ग्राउंडवरून आम्ही तिच्या खोलीवर गेलो. तिचे सर्व साहित्य घेतले आणि एका यशस्वी महिला पोलिस अधिकार्याला घेऊन आम्ही फलटणच्या दिशेने निघालो.
घरात चर्चा सुरू झाली, आता पोस्टिंग कोठे मिळणार? मुंबई, गडचिरोली अशी नावे पुढे येऊ लागली आणि आम्हा सर्वांना मुलगी पास झाली, या आनंदापेक्षा तिला गडचिरोली आणि मुंबई मिळू नये यासाठी प्रार्थना सुरू झाली. योगायोगाने तिला पुणे शहर आयुक्तालय येथे प्रथम पोस्टिंग मिळाले. चतुश्रुंगी पोलीस स्टेशन येथे तीची प्रथम नेमणूक झाली.
१९८५ मध्ये माझे लग्न झाले आणि १९८७ मध्ये सुप्रियाचा जन्म झाला. त्या काळात पहिला मुलगाच व्हावा, अशी सर्वांची अपेक्षा होती किंवा तो काळच असा होता की, पहिल्यांदा मुलगा व्हावा!
सगळ्यांना वाटायचं, आमच्या सौभाग्यवतीला भाऊ नव्हता, त्यामुळे त्यांचीही फार अपेक्षा होती पहिला मुलगा व्हावा; परंतु मी म्हणालो होतो, मला पहिली मुलगीच पाहिजे आणि ती एकटीच पाहिजे. पुढचे अपत्य आपल्याला नको आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे पहिली मुलगी झाली आणि घरात सर्वांना आनंद झाला.
माझे मत होते, मुलगी ही आई – वडिलांची आणि ज्या घरात जाईल त्या घराची, अशी दोन घरांची उन्नती करत असते. दोन्ही घरात तीच स्थान असते. त्यामुळे आपण एका मुलीवरच थांबूया; परंतु ते निसर्गाला मान्य नव्हते. सुप्रियानंतर दुसरी मुलगी शितल आणि तिसरं अपत्य मुलगा व्यंकटेश याचा जन्म झाला.
त्यावेळेला माझी नेमणूक तहसील कार्यालय, खंडाळा येथे होती. खंडाळा हे तालुक्याचे ठिकाण असले तरी त्याची उन्नती न झाल्यामुळे तो ग्रामीण भागच होता. कु. सुप्रिया आणि कु. शीतलचे प्राथमिक शिक्षण खंडाळा येथील शाळेत झाले. सुप्रिया ही शाळेतल्या सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. तेथील सर्व शिक्षकांनी तिच्यावर फार प्रेम केले आणि माझी फलटणला बदली झाली. माझी तीनही मुले फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये शिकू लागली. सुप्रिया १० वी पास झाल्यानंतर आमच्या घरात चर्चा होती की, तिला प्राथमिक शिक्षिका करायचे आणि त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले होते. शारदानगर, बारामती येथे डी. एड्. महाविद्यालय होते आणि शारदानगर येथील विद्यालयास ते कनेक्ट होते. शारदानगर विद्यालयातील विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळत असे, अशी आमची धारणा होती, म्हणून तिला अकरावी – बारावीसाठी शारदानगर येथील महिला विद्यालयात ठेवले; परंतु अपेक्षित मार्क्स न मिळाल्याने तिला डी.एड्.ला प्रवेश मिळाला नाही आणि डोनेशन देऊन प्रवेश घेण्यास माझा वैयक्तिक विरोध होता. त्यामुळे पुढील शिक्षण मुधोजी महाविद्यालयात पदवी पर्यंत पूर्ण केले आणि पदवीनंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी पुणे येथे सदाशिव पेठेत खोली घेऊन राहिली आणि तिथेच तिने क्लास जॉईन केला.
लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांना ती बसली होती आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला सुद्धा तिने अर्ज भरला. सातारा येथे परीक्षा केंद्र होते. तिथे तिने परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली. पुढे फिजिकल आणि मुलाखतीसाठी तिने कोणताही क्लास किंवा अकॅडमी लावली नाही. त्यावेळेला अकॅडमीचे एवढं प्रस्थही नव्हतं. मुधोजी महाविद्यालयाचे खेळाचे शिक्षक सातपुते सर यांनी तिला गोळाफेक, लांब उडी इत्यादीचे ज्या फिजिकलला बाबी होत्या त्या तिच्याकडून करून घेतल्या आणि मुलाखतीसाठी मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मेजर घनवट सर व प्रा. डॉ. फरतारे सर यांनी तिला बहुमोल मार्गदर्शन केले.
सुप्रियाची फिजिकल आणि मुलाखत ही कोल्हापूर येथे होती. कोल्हापूरला फिजिकलला सकाळी ६ वाजता बोलवले होते. त्यामुळे आदल्या दिवशीच कोल्हापूरला आम्ही मुक्कामी गेलो. सकाळी सकाळी पोलीस ग्राउंडवर फिजिकलसाठी हजर राहिलो आणि लांबून मी फिजिकल पाहत बसलो. फिजिकल झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून मुलाखती सुरू झाल्या आणि मुलाखत आणि फिजिकल तिची अत्यंत उत्तम झाली. तिने मला सांगितले, पप्पा मी १००% टक्के सिलेक्ट होणार आणि लोकसेवा आयोगाच्या निकालाची वाट पाहत राहिलो आणि तो एक सुवर्ण दिवस आला. सुप्रिया पोलीस अधिकारी झाली.
– नंदकुमार भोईटे,
निवृत्त निवासी नायब तहसीलदार, फलटण