
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला असून, दुष्काळग्रस्त भागातील जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ऐन आर्थिक संकटामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ नोव्हेंबर : राज्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही बसत असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने परीक्षा शुल्कमाफीची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ २ लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व अधिकार्यांची बैठक घेऊन या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठांमार्फत दुष्काळग्रस्त भागातील एकही विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
विद्यापीठांमार्फत शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षा शुल्क भरले होते, अशा विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ५१ महाविद्यालयांमधील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांचे १ कोटी ८८ लाख ३३ हजार रुपयांचे शुल्क परत करण्यात येत आहे. यातील बहुतांश महाविद्यालयांनी धनादेश स्वीकारले असून, आगामी २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलगुरूंच्या माध्यमातून या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे.





