
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२६ | सातारा |
निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी कास पठारावर उडविलेला तब्बल तीन लाख रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा दरीत कोसळला. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत गर्द झाडीत अडकलेला हा ड्रोन कॅमेरा शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी तासभराच्या प्रयत्नानंतर सुरक्षितपणे बाहेर काढला. ही घटना रविवारी घडली.
हजारो पर्यटक कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी रविवारी आले होते. कर्नाटकातून आलेल्या काही पर्यटकांनी कास परिसराचे निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरा उडविला. मात्र, काही वेळातच ड्रोनचा संपर्क तुटून तो परिसरातील खोल दरीत जाऊन पडला. तीन लाखांचा कॅमेरा दरीत पडल्याने पर्यटकांची चिंता वाढली. परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पर्यटकांनी मदतीसाठी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. ड्रोन दरीतील गर्द झाडीत अडकला असल्याचे आढळून आले. सुमारे दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत दोराच्या सहाय्याने उतरत रेस्क्यू टीमच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली.
टीमने तासभर प्रयत्न केल्यानंतर झाडीत अडकलेला ड्रोन शोधण्यात त्यांना यश आले. रेस्क्यू टीमने ड्रोन सुरक्षितपणे बाहेर काढून संबंधित पर्यटकांच्या स्वाधीन केला. तीन लाख रुपये किमतीचा ड्रोन परत मिळाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.
या मदतीबद्दल त्यांनी रेस्क्यू टीमला तीन हजार रुपये रोख बक्षीस दिले. या मोहिमेत चंद्रसेन पवार, सिद्धार्थ गायकवाड, आदित्य पवार, ऋषी रंकाळे आणि गणेश निपाणे यांनी सहभाग घेतला.