
थेट WhatsApp वर मिळवा
वाढता खर्च आणि इंधनाचे दर यांमुळे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने प्रवासी भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ ऑक्टोबर : इंधनाचे दर, टायर, बॅटरी, सुटे भाग आणि करांमध्ये झालेली वाढ यामुळे बस अँड कार ओनर्स असोसिएशनने खासगी बस व कारच्या भाडेदरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत बस वाहतूक दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, मात्र वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक खर्च वाढल्याने दरवाढ अपरिहार्य
वाहनांच्या किमती, स्पेअर पार्ट्स, देखभाल-दुरुस्ती, चालकांचे वेतन, विमा आणि तांत्रिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा देणे बस मालकांसाठी आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक बनले होते. २०२१ नंतर प्रथमच ही दरवाढ करण्यात येत असून, यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
शालेय बस वाहतूक आणि नव्या दरांची रचना
या दरवाढीसोबतच शालेय बसवाहतुकीसाठीही परिवहन विभागाकडे शुल्कवाढ प्रस्तावित करण्यात आली असून, आगामी शैक्षणिक वर्षापासून ती लागू होण्याची शक्यता आहे. १७ सीटर गाडीसाठी २३ रुपयांऐवजी आता २७ रुपये प्रति किलोमीटर दर असणार आहे, तर ४५ व ४९ सीटर बससाठी दर ४५ रुपयांवरून ५५ रुपये प्रति किलोमीटर करण्यात आला आहे. विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या खासगी वाहन व्यावसायिकांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.





