डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी सिडनीला जाणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जागतिक बँक अनुदानित व भारतीय कृषी संशोधन परिषद संचलित राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रकल्प अंतर्गत दापोली कृषी विद्यापीठातील विद्यार्थी वेस्टर्न सिडनी विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) येथे एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण दहा विद्यार्थी व पाच प्राध्यापकांची ३० दिवसीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामध्ये डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. वैभव राजे महाडिक, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. विनायक पाटील, डॉ. योगेश परूळेकर हे प्राध्यापक तसेच जीवन गोडसे, प्रणिती बिरादार, मानसी बिचवलकर, सुदर्शन पाटलावत, नेहा पाटील, तन्मय जळगावकर, रितेश बाबर, अतुल फंटागडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ते संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत उद्दिष्टांना संबोधित करण्यासाठी हवामान बदल, अन्नसुरक्षा या विषयावर वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमासंबंधी विषयावर प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत.

प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात तंत्रज्ञान विषयक करार करण्यासाठी कुलगुरू डॉ. भावे हे सिडनी येथे उपस्थित राहून आधुनिक कार्यपद्धती तसेच तंत्रज्ञानाची माहिती घेणार आहेत. आज या विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम कुलगुरू परिषद दालनात झाला. कुलगुरू डॉ. भावे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी डॉ. भावे म्हणाले, विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणातून विद्यापीठाचे नाव मोठे करावे. तेथील ज्ञानाचा कोकणातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना जास्तीत जास्त उपयोग करून शेती ही किफायतशीर व शाश्वत होण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रशांत बोडके यांच्या प्रयत्नाने हे विद्यार्थी व शास्त्रज्ञ प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत.

यावेळी संशोधन संचालक डॉ. यशवंत खांदेतोड, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर व सर्व सहयोगी अधिष्ठाता व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!