
स्थैर्य, फलटण, दि.२१: फलटण तालुक्यातील शिंदेवाडीचे सुपुत्र राम शिंदे यांची कन्या व नानासो शिंदे यांची पुतणी डॉ.शर्मिष्ठा शिंदे हिने मिस लेगसी युनीव्हर्स 2020 हि जागतीक सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. शर्मिष्ठाने या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम क्रमांक पटकावला. घानाची सौंदर्यवती त्रिसिया बासोह द्वितीय व इंडोनिशियाची साब्रीना आयुल हिने तृतीय क्रमांक मिळवला.
यापूर्वी हैद्राबादमध्ये झालेली कँपस प्रिंसेस फायनलीस्ट 2020 हि सौंदर्य स्पर्धा शर्मिष्ठाने जिंकली आहे. मिस इंडिया या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी 2020 मध्ये केले होते. या स्पर्धेच्या परिक्षक श्रेया राव (मीस इंडीया रनरअप 2018) होत्या.
शर्मिष्ठा कथक आणि बेली डांसमध्ये प्रविण असुन प्रसिद्ध मॉडेल आहे. देश परदेशातील जाहीरातींमध्ये ती भाग घेते. शर्मिष्ठाने दंत वैद्याचा कोर्स पुर्ण केला असून पुढील उच्च शिक्षणाकरिता ती अमेरिकाला जाणार आहे.
डॉ.शर्मिष्ठा राम शिंदे हिचा या यशाबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्या अॅड.सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील आयुष्यात दिवसेंदिवस अशीच उत्तरोत्तर प्रगती करून फलटणचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.

