डॉ. राजश्री देशपांडे यांच्या ‘अन्वयांची अक्षरलिपी’या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । सातारा । शनिवारी५ फेब्रुवारी २०२२ रोजी, सायंकाळी श्री.छ. प्रतापसिंहमहाराज(थोरले)नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये डॉ. राजश्री देशपांडे यांच्या ‘अन्वयांची अक्षरलिपी’या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. विख्यात संशोधक आणि विवेकानंदांचे गाढे अभ्यासक मा. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व ज्येष्ठ समीक्षक आणि पुरोगामी विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कवयित्री अंजली ढमाळ आणि साहित्यिक कवी संजय बोरुडे उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने  मा.श्री.किशोर बेडकीहाळ यांनी काव्यासंग्रहाचे विस्तृत विवेचन केले. काव्यसंग्रहातील तीन प्रमुख भागातील कवितांची विभागणी आणि त्यांची मांडणी याबद्दल माहिती देत त्यांनी शेवटच्या भागातल्या सामाजिक आशयाच्या कवितांमध्ये कवयित्रीची प्रतिभा लखलखीतपणे समोर आल्याचे आवर्जून सांगितले. राजश्री देशपांडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मराठीच्या मराठी कवितेच्या प्रांतात पक्क पाऊल उडवून प्रवेश करता झाला आहे असे ते म्हणाले. समकाळाला भिडून समकाळ स्वतःमध्ये मुरवून घेणारी ही कविता आहे असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दाभोळकर यांनी या कवितेचे नाते मराठीतल्या आद्य संत कवयित्रींपासून आत्ताच्या कवयित्री पर्यंत कोणाच्या कवितेशी आहे हे उलगडत सुरुवात केली. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक, मनोविकारतज्ञ असणाऱ्या कवयित्रीचे मनाचा गुंता व्यक्त करणारे हे काव्य भारतीय कविता प्रांतात प्रथमच अशा संग्रहातून पुढे येथे आहे असे त्यांनी म्हटले. भाषेची विलक्षण मोड-जोड करणारी अनवट वाटेवरची हटके कविता असल्याचे त्यांनी सांगितले. कवयित्री डॉ.राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या मनोगतात त्यांच्या कवितेचा प्रवास शालेय वयापासून कवितासंग्रह पर्यंत कसा झाला हे सांगितले. कवी डॉ. संजय बोरुडे यांच्या भाषणात त्यांनी ही कविता,सद्य  कविताक्षेत्रातील साचलेपण छेदणारी असल्याने प्रकाशित करावीशी वाटली असे त्यांच्या मनोगतात सांगितले. याप्रसंगी कवयित्री अंजली ढमाळ यांनी मनोगत व्यक्त करताना ही कविता सखोल ,निर्भय असूनही आक्रमक नाही अभिनिवेशी नाही असे सांगितले .कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन कवी साहिल कबीर यांनी केले .त्यांनी मुंबईच्या स्त्रीवादी कवयित्री योगिनी राउळ यांनी पाठवलेल्या लिखित शुभेच्छा वाचून दाखवल्या. सरतेशेवटी श्री मिनाज सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.
 याप्रसंगी डॉ. सतीश बर्गे डॉ.सुहास पोळ, डॉ.अनिल पाटील, डॉ. दीपांजली पवार,ऍड वर्षा देशपांडे, पत्रकार विजय मांडके,  शिवाजी कॉलेजच्या माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. मानसी लाटकर, श्री.चंद्रकांत खंडाईत, फिटनेस प्रशिक्षिका  सपना पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!