
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, नागपूर, दि.१८: नागपूरजवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासाठी केंद्र शासनाने 4.25 कोटी रूपयांचा निधी वितरीत केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त नागपूरजवळील शांतीवन, (चिंचोळी) येथील बाबासाहेबांच्या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनाने 2016 मध्ये 17.3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी पहिला हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा निधी नोव्हेंबर 2016 मध्ये दिला. दुसऱ्या हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा निधी 17 फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात आला.
शांतीवनमधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत जवळपास 400 पेक्षा अधिक वस्तु आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपडे यामध्ये सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकीली करीत असतानाचा बॅरिस्टर गाऊन येथे आहे. त्यांची हस्तलिखीत पत्रे, ग्रामोफोन, छड़ी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपराइटर अशा अनेक वस्तु या संग्रहालयात आहेत.
शांतीवन, चिंचोळीच्या संग्रहालयाचे लोकार्पण 6 डिसेंबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल, अशी अपेक्षा डॉ. आंबेडकर फॉऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे.





