दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गणेशोत्सवानिमित्त ब्रह्मकुमारी डॉ. छाया दीदींच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सव हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून गणेशोत्सवास सुरुवात होते. सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील ईश्वरकृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरेमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
यामध्ये स्त्री-पुरुष समानता हे मूल्य जोपासत पुरुषांबरोबर महिला शिक्षकांनाही आरतीचा मान देण्यात आला. गणपती विसर्जनावेळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीचे सर्व विद्यार्थी गणपतीचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले. यावेळी इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स सादर केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वरतात्या गावडे यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.
गणेश उत्सवानिमित्त शाळेमध्ये ब्रह्मकुमारीं डॉक्टर छाया दीदी संचालिका प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्र फलटण यांचे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील अडीअडचणींवर शांततेच्या मार्गाने कशी मात करावी हे सांगितले. यावेळी ब्रह्मकुमारीं डॉक्टर छाया दीदी यांनी शालेय मुलांना ध्यानधारणा अभ्यासामध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडते व त्याचे फायदे समजावून सांगितले. तसेच जीवन जगण्याची कला, यशस्वी आणि आनंदायी जीवनासाठी आवश्यक मूल्ये या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे सर यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये नीतिमूल्य आत्मसात करावीत व सुसंस्कारी पिढी निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी ब्रह्मकुमारीं डॉक्टर छाया दीदी, ब्रह्माकुमारी पद्मा पाटील, ब्रह्माकुमारी विद्या दीदी, ब्रह्माकुमारी सोनाली दीदी यांचे आभार मानण्यात आले.
संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल गावडे सर यांनी त्यांचे आभार मानले. या शिबिराप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन चक्रधर जाधव सर यांनी केले.