
स्थैर्य, फलटण, दि. २९ : दिवसेंदिवस रक्ताच्या मागणीत वाढ होत असताना, त्याच्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे रक्ताची आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागते. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, आपण स्वतः किंवा आपल्या मित्र परिवारास रक्त दानासाठी उद्युक्त करावे, म्हणजे ब्लड बँक जरुरीच्या वेळी रुग्णांना रक्तपुरवठा करु शकेल. रक्त पेढीच्या आवाहनाला फलटण व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याचे नमूद करीत सद्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव व अन्य आजाराच्या रुग्णासाठी केंव्हाही रक्ताची गरज भासू शकत असल्याने सर्व प्रकारचे रक्त उपलब्ध असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आपण स्वतः रक्तदान केले आहे, त्या प्रमाणे तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली दीपक चव्हाण यांनी केले. सध्या फलटण येथील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा भासत आहे तरी फलटण तालुकत्यातील नागरिकांनी सहकार्याची अपेक्षा ठेवून रक्तदान करावे असे डॉ. बिपीन शहा, डॉ. श्रीकांत करवा, डॉ. संतोष गांधी, डॉ. दत्तात्रय देशपांडे यांनी केले. रक्तदान करण्यासाठी डॉ. बिपीन शहा (मो.बा.: ९८५०५०१९८०) यांच्याशी संपर्क साधावा.
आवश्यक शस्त्रक्रिया किंवा प्रसुतीच्यावेळी रक्त लागल्यास काय ?
लॉक डाऊन कालावधी वाढल्यामुळे रक्तसंकलनाचे प्रमाण कमी झाल्याने येत्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने रक्ताचे विविध प्रकारचे आजार असलेल्यांना किंवा प्रसूती वा इतर अत्यावश्यक शस्त्रक्रियांची गरज असलेल्यांसाठी रक्ताची उपलब्धता कशी करायची, हा प्रश्न आता रक्तपेढ्यांपुढे निर्माण झाला आहे.
रक्तदानाद्वारे सहकार्याचे आवाहन
लॉक डाऊनचा कालावधी वाढेल याची कल्पना नसल्याने राज्यातील रक्तपेढ्यांनी तेवढ्याच कालावधीसाठी रक्ताचे नियोजन केले होते. रक्त हे एका ठराविक काल मर्यादेपलीकडे साठवून ठेवता येत नाही. यामुळेच संभाव्य परिस्थिती लक्षात घेता फलटण ब्लड बँकेने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले असून त्यास प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील ब्लड बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत फलटणचे आ. दिपकराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशालीताई चव्हाण, दै. स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे, सुधीर महादेव फडके, सतीश राजाराम गायकवाड यांनी स्वेच्छा रक्तदान केले आहे.