दोघांनी मिळून करा; पण फलटण शहर स्वच्छ व सुशोभित करा; फलटणकरांचा सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 31 डिसेंबर 2023 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । गेल्या दोन दिवसांपासून फलटण शहरामध्ये महापुरुषांच्या पुतळा व चौक सुशोभीकरणाच्या श्रेयवादावरुन सोशल मीडियावर चांगलेच वातावरण तापले आहे. सदर नियोजित महापुरुष पुतळे व चौक सुशोभीकरण कामासाठी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ऑगस्ट महिन्यातच निधी मंजुर करून आणला असल्याचे राजे गटाकडून तर या कामांसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निधी मंजूर करून आणल्याबाबतचे पत्र खासदार गटाकडून व्हायरल करण्यात आले. यातून सदर नियोजित कामांबाबतचा श्रेयवाद चव्हाट्यावर आल्यानंतर भले दोघे मिळून काम करा; पण फलटण शहर स्वच्छ व सुशोभित करा; असा सूर सर्वसामान्य फलटणकरांमधून उमटताना दिसत आहे.

सन 1991 पासून फलटण नगरपरिषदेवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे एकहाती सत्ता आहे. फलटण शहरासह तालुक्याच्या राजकीय पटलावर श्रीमंत रामराजे यांच्या रुपाने राजे गटाचे वर्चस्व प्रस्थापित असल्याने अनेक विकासकामांचा ओघ त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली व जिंकली. तेव्हापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरासह तालुक्यात विविध विकास कामांसाठीचा मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात मोठे यश मिळवले आहे. या दोन्ही नेतृत्त्वांचे सरकार दरबारी मोठे वजन असल्याने त्यांनी मागणी केलेल्या विकासकामांना हिरवा कंदील मिळत असतो; मात्र एकाच कामांसाठी दोघांकडून कमी – जास्त प्रमाणात प्रयत्न झाल्यास दोन्ही गटाकडून विकासकामांच्या श्रेयवादावरुन चांगलीच हमरी – तुमरी रंगताना दिसत आहे.

वास्तविक पाहता गेल्या काही महिन्यांपासून नवीन महायुती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), शिवसेना यांचे राज्यस्तरीय नेते एकत्रित आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता राजकीय नेत्यांनी फलटणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकत्रित येवून फलटणचा सर्वांगीण विकास साधावा; अशी फक्त अपेक्षा फलटणकर नागरिक करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!