नायब तहसीलदारांवर कारवाईसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा ठिय्या आंदोलनाचा इशारा


दैनिक स्थैर्य । 10 मे 2025। फलटण । येथील तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणार्‍या नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते या दिव्यांग, विधवा तसेच ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरून हीन स्वरुपाची वागणूक देतात, त्यांच्यावर 8 दिवसांत कडक कारवाई न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष सागर गावडे यांनी तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात कार्यरत असणार्‍या नायब तहसीलदार श्रीमती भक्ती सरवदे – देवकाते या दिव्यांग, विधवा तसेच ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरून हीन स्वरुपाची वागणूक देतात. दिव्यांगांनी कोणत्याही समस्येबाबत त्यांना विचारले असता माझ्या कडे अधिकार नसून सर्व अधिकार तहसीलदारांना आहेत अशी उत्तर देतात. तसेच संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी पात्र लाभार्थी यादी लावण्यास विलंब, वेळेवर मिटिंग न घेणे, 1 वर्षापासून लाभार्थी लाभापासून वंचित ठेवलेले आहेत. अशा बेजबाबदार अधिकार्‍यावर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायदा अंतर्गत कारवाई करावी. संबंधितांवर 8 दिवसांत कारवाई न झाल्यास जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे तहसिल कार्यालय समोर प्रहार ठिय्या आंदोलन करणार आहोत.

या निवेदनावर सागर गावडे, महेश जगताप, राहुल गावडे, जितेंद्र मोहिते, अभिषेक गुंजवटे आदी मान्यवरांच्या सह्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!