
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महादेव घुले,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर , मोहिम अधिकारी दत्तात्रेय येळे ,महाबीज अधिकारी सुनील पारदे खते बियाणे विक्रेता संघटनेचे प्रतिनिधी खत उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध खते व बियाणे विषयी सविस्तर आढावा घेतला. खत उत्पादक कंपनी प्रतिनिधींना देण्यात आलेल्या नियोजनानुसार खत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. खरीप हंगाम 2022 करता 4500 क्विंटल बियाण्याची गरज असून आज आखेर 36 717 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. प्रमुख बियाण्याची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नसून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचे महाबीज व बियाणे कंपनी यांनी सांगितले.
रासायनिक खताच्या बाबतीत खरीप हंगामासाठी 123010 मेट्रिक टन खताचे अनुदान मंजूर झालेले असून आज अखेर 73 386 मेट्रिक टन खत उपलब्ध झालेले आहे.
जिल्ह्यात खताची टंचाई होऊ नये यासाठी युरिया 2548 मेट्रिक टन तर डीएपी 1005 मेट्रिक टन खताचा संरक्षित साठा करण्यात आलेला आहे, हा साठा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे.
इको कंपनीचे प्रतिनिधी संदीप रोकडे यांनी नॅनो युरिया याबाबत प्रेझेंटेशन सादर केले व खत बचतीबाबत चे महत्व सांगितले.