
दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । सातारा । कोविड-19 महामारीमुळे 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत दोन्ही पालक किंवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह तर 18 वर्षावरील बालकांना निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या हस्ते पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड वितरण करण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या मुलांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, जिल्हा पर्यवेक्षीका आतिष शिंदे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती यांच्यासह महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुलांची सर्वसमावेशक काळजी आणि संरक्षण यासाठी शाश्वत पध्दतीने त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, शिक्षण आणि शिष्यवृत्तीद्वारे त्यांना सक्षम बनवणे, वयाची 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपये आर्थिक सहाय्य पुरवून स्वयंपूर्ण अस्तित्वासाठी सुसज्ज बनवणे आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे निरामय आरोग्य सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
श्री. तावरे यावेळी योजनेविषयी माहिती दिली. कार्यक्रमास दोन्ही पालक गमावलेले बालके व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.