दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
भारतीय कृत्रीम अपंग निर्माण निगम, कानपूर या केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे सहाय्यक साधनांच्या साहित्याचे वाटप दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या वेळेत दरबार हॉल, फलटण (तहसील कार्यालयाशेजारी) या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण व तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या वाटप कार्यक्रमात फलटण ग्रामीण भागातील १७०४ व फलटण नगर परिषद हद्दीतील ८४ असा एकूण १७८८ दिव्यांग लाभार्थींना २००७ सहायभूत साहित्याचे जसे की, तीन चाकी सायकल, वॉकर, चष्मे, कुबडी, स्वयंचलित सायकल, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र इ.चे वाटप करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र लाभार्थींच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत व नगर परिषद यांना देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग लाभार्थींनी या यादीमध्ये आपल्या नावाची खात्री करून कार्यक्रमासाठी नियोजित दिनांकावेळी आधार कार्डच्या दोन झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय कृत्रीम अपंग निर्माण निगम या संस्थेकडून करण्यात आले आहे.