दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सोमंथळी (ता. फलटण) येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री मारुती मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारुतीला ‘नवश्या मारुती’ म्हणून संबोधले जाते. या मंदिरात श्रावणातील शेवटच्या शनिवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ६ वाजता महाआरती, ८ ते ९ प्रवचन ह. भ. प. पांडुरंग महाराज सोडमिसे, दुपारी १२ ते संध्याकाळपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी १ वाजल्यापासून सार्वजनिक महाप्रसादाला सुरुवात झाली. याचा लाभ पंचक्रोशीतील लहानथोरांसह महिलांनी घेतला.
या मारुतीच्या दर्शनासाठी भाजपाचे युवा नेते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन महाप्रसादाचा आनंद घेतला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने हार-श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.
महाप्रसादाचा लाभ सुमारे दहा हजार भाविक भक्तांनी घेतला, अशी माहिती या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय सोडमिसे व ट्रस्ट सदस्यांच्या वतीने देण्यात आली.