व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्या वतीने दिले जाणार्या पुरस्काराचे वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण दि.१५: व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्यावतीने प्रतिवर्षी दिले जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित, राणी लक्ष्मीबाई व येसाजी कंक हे 4 पुरस्कार पिंप्रद, ता. फलटण येथील संघाचे मध्यवर्ती कार्यालयात आयोजित समारंभात मोठ्या उत्साही वातावरणात युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कर्‍हाडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते, यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष विलासबाबा जवळ, मार्गदर्शक इंजि. प्रमोदजी भापकर, अध्यत्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रामुख्याने व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष शहाजी काळे, उपाध्यक्ष मारुती शेळके, सचिव विवेक राऊत यांच्यासह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यसनमुक्त युवक संघाचा हा पुरस्कार वितरण सोहोळा व 5 दिवसांचे निवासी शिबीर (प्रतापी संस्कार सोहोळा) राज्यातील एका ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा सोहोळा पिंप्रद येथे आयोजित करण्यात आला होता.

संतवीर ह.भ.प. बंडा तात्या कर्‍हाडकर व व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून गेली 19 वर्षे वर्ष राज्यातील इतिहासकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्य सेनानी शेलारमामा, विलासबाबा जवळ या सारख्या मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. 

यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार मिरी, ता. पाथर्डी हल्ली श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील जेष्ठ इतिहासकार व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक प्रा. डॉ. नारायण सखाराम गवळी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, शिवतेज दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

प्रा. डॉ. नारायण गवळी यांनी नगर जिल्ह्यातील इतिहास कालिन वास्तूंचा परामर्श घेऊन त्या जतन करण्यासाठी अविरत मेहनत घेतली आहे. त्याचप्रमाणे गेल्या सुमारे 20 वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्षात्रतीर्थ धर्मवीरगड, पेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील किल्ल्याच्या ठिकाणी वृक्षारोपण, शासकीय पूजन, धर्मवीरगड ते वढू बु॥ शक्तीज्योत शौर्य यात्रा, अहमदनगर जिल्ह्यातील इतिहास कालीन वास्तू या विषयावर प्रबंध सादर करुन डॉक्टरेट मिळविली आहे. श्रीगोदा येथील महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी उत्तम केले असून या कालावधीत पंढरपूर शहर विकास आराखडा तयार करुन मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे कडे सोपविला असून या आणि अनेक सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन संघटनेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करुन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे.

राष्ट्रबंधू राजीव दिक्षीत यांच्या नावाने देण्यात येत असलेल्या पुरस्काराने वडापुरी, ता. इंदापूर येथील प्रा. धनंजय शामराव देशमुख यांना गौरविण्यात आले सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख 11 हजार रुपये, शाल, श्रीफळ, शिवतेज दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

प्रा. धनंजय देशमुख अकलुज येथील महर्षी प्रशालेत प्राध्यापक असून त्यांनी राजीवजी दीक्षित यांच्या स्वदेशी, गोमाता, दवा ना खाना, आरोग्यमंत्र, योगा प्राणायम या कार्यात आपले जीवन समर्पित केले आहे. कोरोना कालावधीत अकलुज शहरात दररोज किमान 20 ते 25 अंध, अपंग, निराधार लोकांना 8/9 महिन्यापासून, भोजनाची व्यवस्था केली असून त्यांना आहे त्या ठिकाणी जेवण पोहोच केले आहे. टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात सुमारे दहा वर्षांपासून निराधार लोकांसाठी सार्थक दिपवाळी हा उपक्रम आयोजित करतात ते या संस्थेचे संचालक असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, सर्पमित्र म्हणूनही काम करतात.

राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने दुशेरे, ता. कराड येथील कु. वर्षा किसन जाधव या अपंग भगिनीस व्यसनमुक्त युवक संघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनीषाताई नंदकुमार जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख 11 हजार रुपये, शाल, श्रीफळ, शिवतेज दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सत्कारमूर्ती कु. वर्षा जाधव या दोन्ही पायांनी अपंग असून त्यांनी दुशेरे, ता. कराड येथे अपंगांसाठी निवासी गुरुकुल सुरु केले आहे, त्या स्वत: अभियांत्रिकी पदवीधर आहेत. शारीरिक अपंगत्व असताना इतर अपंगांसाठी झटणार्‍या या युवतीस या वर्षीच्या राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, शिवतेज दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

येसाजी कंक यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्काराने न्हरे, ता. भोर येथील रवींद्र वीर यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख 11 हजार रुपये, शाल, श्रीफळ, शिवतेज दिनदर्शिका असे या पुरस्काराचे स्वरुप असून संघटनेचे मार्गदर्शक इंजि. प्रमोदजी भापकर यांच्या हस्ते या पुरस्काराने रवींद्र वीर यांना गौरविण्यात आले.

रवींद्र वीर यांनी इतिहासाचा वारसा जपत अनेक गड किल्यावर पदभ्रमंती केली असून त्यांनी आग्रा ते राजगड असा 1500 कि.मी. पायी प्रवास युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली 40 दिवसात पूर्ण केला आहे. आतापर्यंत 90 किल्ले पायी पदभ्रमंती केली आहे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या न्हरे गावातील या मावळ्यांस किल्ल्यावर जाण्यासाठी असणार्‍या अनेक पाऊलवाटा माहीत असून, किल्यावरील इतिहास मुखोदगत आहे. शासनाच्या जलसंपदा विभागात सेवा करीत आहेत. 

या चार पुरस्कारा नंतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मारुती शेळके यांची कन्या वै. कु. ज्ञानेश्वरी हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता 10 वी मध्ये 98.20 % गुण प्राप्त केलेली कु. श्रद्धा दादासाहेब नरळे, म्हसवड, 98.20 % गुण प्राप्त कु. प्रणाली उत्तमराव जाधव, सुलतानगादे जि. सांगली व 78 % गुण प्राप्त अनिकेत जितेंद्र फडतरे, गोखळी, ता. फलटण या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, 5 हजार रोख, शाल, श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले. या वेळी या तिन्ही विद्यार्थ्यांनी समाजासाठी उच्च शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी, डॉक्टर, व भारतीय नौदल सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला. 

प्रारंभी मच्छिद्रनाथ नागरगोजे यांनी स्वागत गीत, वैभव यादव यांनी प्रेरणा गीत सादर केले. ह.भ.प. संतवीर बंडा तात्या कर्‍हाडकर यांनी संघटनेच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे कौतुक करुन संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात अरविंद मेहता यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्याचे कौतुक करताना सर्वत्र रावण आहेत असे न मानता समाजातील बिभीषण शोधून त्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविणार्‍या या संघटनेला समाजाने पाठींबा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. देव, देश आणि धर्म यासाठी कार्य करणारी ही संघटना नक्कीच समाजात आदर्श व सदाचारी युवक घडवीत असून राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल पिंप्रदच्या माध्यमातून समाजसेवा व देशसेवा करणारे युवक घडविताना तो स्वयंपूर्ण, सदाचारी, समाजाला बरोबर घेऊन जाणारा असला पाहिजे यासाठी युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कर्‍हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत संत ज्ञानेश्वर गोपालन व संशोधन संस्था, राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत गुरुकुल, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या तीन स्वतंत्र संस्था एकाच ध्येयाने कार्यरत असून ह.भ.प. बंडा महाराज कर्‍हाडकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेले या संस्थांचे कामकाज निश्रि्चत परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय सस्ते यांनी, समारोप व आभार संघाचे अध्यक्ष शहाजी काळे यांनी मानले. शेवटी ’हा देश माझा’ या देशभक्तीपर गीताने व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!