स्थैर्य, जालना, दि.१३ : राज्यात कोरोनाच्या
चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल
12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्य सरकारने खरेदी केलेल्या जीसीसी बायोटेक लि. कंपनीच्या किट्स सदोष
असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.
या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित
करणा-या जीसीसी बायोटेक लि. कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता
असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. तसंच जीसीसी बायोटेक लि. या
कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा
करणा-या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.’
यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, जीसीसी बायोटेक लि. कंपनीच्या
माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो
पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की जीसीसी बायोटेक
लि. च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणा-या
कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे, तिथले
निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या
किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू
नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची
काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या
खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग
हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर 27 टक्क्यांपर्यंत खाली
आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली
जाईल.’
आरटी पीसीआर किट्स हा घोटाळा : बबनराव लोणीकर
आरटी पीसीआर किट्स हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव
लोणीकर यांनी केला आहे. 12 लाख 50 हजार किट्स खरेदी केल्या. किट्स
वापरायच्या थांबल्या. आता याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. ही सामुदायिक
जबाबदारी आहेत. ही किट्स वापरुन जनतेच्या जिवाशी खेळ केला. रोज जालना
जिल्ह्यात रोज 200 ते 250 पॉझिटिव्ह येत होते. पण ही किट्स वापरण्यास
सुरुवात केल्यावर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत आला. या किट्स
सदोष आहेत. यामुळे आकडे खाली आले असं एनआयव्हीने लक्षात आणून दिलं, असं
लोणीकर म्हणाले.