स्थैर्य, दि.१०: काँग्रेस आणि यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सोनिया गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचे सरकार वर्षभर टिकले. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यामुळे शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला असल्याचे समजते.