स्थैर्य, दि.१०: मुद्रांक शुल्कात कपात आणि
दिवाळीच्या सणामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील हालचालींना विशेष गती
आल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरदरम्यान मुंबईत घरांच्या विक्रीत
वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ६७% जास्त विक्री पाहायला मिळाली आहे. २०२० मध्ये
नोव्हेंबर सलग तिसरा असा महिना राहिला, ज्यात घरांच्या विक्रीत वाढ
पाहायला मिळाली आहे. प्रमुख आंतरराष्ट्रीय मालमत्ता कन्सल्टन्सी फर्म नाइट
फ्रँक इंडियाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, मुंबई
निवासी क्षेत्रात नोव्हेंबरदरम्यान एकूण ९,३०१ घरांची विक्री झाली. ही
गेल्या नऊ वर्षांत कोणत्याही नोव्हेंबर महिन्यात झालेली सर्वात जास्त
विक्री आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये मुंबईमध्ये ५,५७४ घरांची विक्री झाली
होती. तज्ज्ञांनुसार, विक्रीतील ही तेजी महाराष्ट्र सरकारकडून मुद्रांक
शुल्कात केलेल्या तात्पुरत्या कपातीमुळे आली आहे. महाराष्ट्र सरकारने
ऑगस्टच्या अखेरीस राज्यात स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर मुद्रांक शुल्क
घटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान
यामध्ये ३% कपात लागू आहे व पुढील वर्षी १ जानेवारीपासून ३१ मार्चदरम्यान
ही सूट २ %राहील.
या कारणांमुळे वाढली घरांची विक्री
> सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क ३०० आधार अंकाची कपात.
> सणासुदीतील विक्रीतूनही मदत मिळाली आहे.
> गृह कर्जाचे व्याजदर आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहेत.
> डेव्हलपर्स डेफर्ड पेमेंटसह जास्त प्रोत्साहन देत आहेत.
> लॉकडाऊनमध्ये आणखी एका खोलीची गरज भासली.
शुल्क कमी, राज्याला मार्चसारखा महसूल
वर्ष-20 शुल्क संकलन
जानेवारी 454.1
फेब्रुवारी 437.5
मार्च 304.9
एप्रिल –
मे 16.4
जून 153.2
जुलै 214.3
ऑगस्ट 176.4
सप्टेंबर 180.5
ऑक्टोबर 232.8
नोव्हेंबर 287.9
(आकडे कोटी रुपयांत)
घरांची मागणी चांगली राहण्याची आशा
लोकांच्या
उत्पन्नाची पातळी सामान्य होत आहे. घर खरेदीची ही योग्य वेळ आहे. मुद्रांक
शुल्कात सूट जारी राहिल्याने घरांची मागणी चांगली राहण्याची आशा आहे.
आम्हाला वाटते की, या वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत मोठ्या संख्येने लोक घर
खरेदी करतील. – शिशिर बैजल, सीएमडी, नाइट फ्रँक इंडिया