प्रवचने – भगवंताचा विसर हेच मोठे पाप !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे पाहावे. ज्यांनी भगवंताला जाणले, त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. ’सर्व विषयवासना सोडून भगवंताला शरण जावे’ हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे; कारण स्वतः अनुभव घेऊन, म्हणजेच स्वतः मुक्त होऊन, त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहीले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही ? मग भगवंताला शरण जायला का भ्यावे ? खरोखर, सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.

नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुऊन मागे लागतात. म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे ! तथापि काही झाले तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत ? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण ? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही; त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो, नाही का ? स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे ? काल झालेले आज नाही सुधारता येणार; पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता, थोडे कष्ट का घेऊ नयेत ? खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना, म्हणजेच विषयांचे हवे-नकोपण जसजसे कमी होईल, तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तर्‍हेने, ’तू आहेस, मी नाही’ ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल, तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निदिध्यासाने आनंद-साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय.

भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की, बाकीच्याचा त्याग आपोआप होतो.


Back to top button
Don`t copy text!