प्रवचने – भगवंताचे नाम सोडू नका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


संकल्प ही फार मोठी शक्ति आहे. इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या, तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट, भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे, आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी ‘भगवंत मला हवा’ अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे, म्हणजे ‘तू मला हवास’ असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला, तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही.

नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, ते करीतच असते, म्हणून कशाकरता का होईना, नाम घ्या. पण निर्विषय होण्याकरिता घेतले तर काम शीघ्र होईल. साधन तेच, आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही, यापरते दुसरे साधन नाही, असा दृढ भाव असावा. आपण कोणचेही कृत्य करीत असताना, ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, ते आपण कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला ‘मी विषयाचा आहे’ असे वाटू लागले. संत ‘तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस,’ असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी; आणि याकरता ते नाम सांगतात, नाम घेणे म्हणजे ‘मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे’ असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे, आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.

भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे, त्याचे काम झालेच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादि काही नको असे वाटते का ? तसे नसेल तर, ‘भगवंत मला हवा आहे’ असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे, तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.


Back to top button
Don`t copy text!