दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगामार्फत ‘स्वीप’अंतर्गत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे. ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण विधानसभा मतदारसंघामधील दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचे काम विविध उपक्रम व वेगवेगळ्या स्तरावर तसेच वृत्तपत्र तसेच विविध मीडियाच्या माध्यमाद्वारे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पंचायत समिती फलटण येथे शनिवारी दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून मतदान महत्त्व प्रदर्शित करून दिव्यांग मतदारांचे स्वागत केले. सेल्फी पॉइंटद्वारे सेल्फीची उभारणी केली होती.
यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण चंद्रकांत बोडरे यांनी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’ यानुसार लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामध्ये मतदारांनी सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावून लोकसभेच्या उत्सवात सहभागी व्हावे तसेच दिव्यांग मतदारांसाठी पुरवण्यात येणार्या सोयीसुविधा तसेच सक्षम अॅपद्वारे दिव्यांगासाठी व्हीलचेअर, वाहन सुविधा, स्वयंसेवकांद्वारे मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाच्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. दिव्यांग मतदारांनी या सुविधेच्या आधारे शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढवा, असे आवाहन चंद्रकांत बोडरे यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी नगरपरिषद फलटण निखिल मोरे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे खूप महत्वाचे असून संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार प्रत्येक मतदाराने बजावावा आणि मतदारांनी दि. ७ मे २०२४ रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच स्विप नोडल अधिकारी फलटण एस. के. कुंभार व श्रीमती धन्वंतरी साळुंखे व स्वीप पथक प्रमुख शहाजी शिंदे यांनी मतदार यांनी मतदान करण्याबाबत मनोगत व्यक्त केले.
स्वीप सहाय्यक अधिकारी सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिव्यांग मतदारांनी मतदानाची शपथ घेतली.
‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो |
आपलं मत, आपलं भविष्य ॥
मी दिव्यांग मतदार, शंभर टक्के मतदान करणार |
मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा ॥’
या घोषवाक्यांनी सभागृह दुमदुमले.
यावेळी फलटण तालुक्यातील दिव्यांग मतदार तसेच स्वीप टीम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.