स्थैर्य, नवी दिल्ली, दि.५: आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यात पुढील सुनावणीची तारीख दिली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 मार्च ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, तर विरोधी याचिकाकर्त्यांना 3 दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. यात केंद्र सरकारही आपली बाजू मांडणार आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे आज मराठा आरक्षणाची सुनावणी झाली. मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये. जी सुनावणी होणार आहे ती समोरासमोर व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायमूर्तींनी या प्रकरणावर पुढील सुनावणी ही 8 मार्च घेण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणीही सर्व याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीत समोरासमोर होण्याची शक्यता आहे.