NDA ला 125 आणि महाआघाडीला 110 सीट, नितीश यांना दिग्विजय म्हणाले – ‘संघाला सोडून तेजस्वीला आशीर्वाद द्या’


 

स्थैर्य,दि ११: मंगळवारी जवळपास 18 तासांच्या काउंटिंग नंतर बिहारमध्ये निकाल स्पष्ट झाले आहेत. NDA 125 जागांसह सत्ता टिकवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र सर्वात जास्त नुकसान झालेला पक्ष हा नितीश कुमार यांचा जदयूच आहे. गेल्या वेळपेक्षा जदयूचे 28 सीट कमी झाले आहे आणि जदयू केवळ 43 सीटवर आली आहे. तसेच भाजप 21 जागांच्या फायद्यासह 74 जागांवर पोहोचली आहे. राजद सर्वात मोठा पक्ष बना आहे. त्यांना 75 सीट मिळाले आहेत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत नितीश कुमारांना तेजस्वी यादवला आशीर्वाद द्या असे म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी एकापाठोपाठ एक ट्विट करत म्हणाले की, ‘भाजप आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात. ते झाड वाळून जाते. त्यानंतर ती वेल त्यावर त्यावर कब्जा मिळवते. नितीशजी लालू प्रसाद यादव यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनांमध्ये तुम्ही सोबतच तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडून देऊन तेजस्वी यांना आशीर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या असलेल्या भाजपा आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा.’ असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

पुढे दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘नितीश जी, बिहार तुमच्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात या. सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य आणण्यास मदत करा. इंग्रजांनी वाढवलेली ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ ही संघाने जोपासलेली नीती हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले.’

तसेच दिग्विजय म्हणाले की, ‘हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्ही त्यांच्याच वारशामधून समोर आलेले राजकारणी आहात आता तिथेच या. तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, जनता पक्ष संघाच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून फुटला होता. आता भाजप आणि संघाची साथ सोडा आणि देशाचा विनाश होण्यापासून वाचवा’ असे दिग्विजय सिंह म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!