दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
भारतातील स्वाभिमानी आणि कष्टाळू महिलांना व्यवसाय वृध्दीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्या आपल्या व्यक्तिगत किंवा बचत गटाच्या माध्यमातून एकत्रितरित्या उत्तम व्यवसायाद्वारे स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात, या भावनेने राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत स्वनिधी योजनेतून १० हजार रूपयांचे अनुदान अशा महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उपलब्ध होत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांनी केले.
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक १०, ११ व १२ मधील महिलांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना अनुप शहा बोलत होते. यावेळी स्वनिधी योजनेंतर्गत पहिल्या ५० महिलांना प्रत्येकी १० हजार रूपये स्वनिधी रकमेचे वितरण करण्यात आले.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे निदर्शनास आणून देत त्यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५० महिलांना अनुदान वितरीत करण्यात आले असून उर्वरित महिलांनाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अनुप शहा यांनी यावेळी दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत खर्या अर्थाने महिलांना सन्मान देण्याचे, त्यांना स्वाभिमानाने समाजात उभा राहून उद्योग व्यवसायाद्वारे आपल्या कुटुंबाला हातभार लावता यावा, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित असल्याचे सांगून जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपले कुटुंब सक्षम करावे तसेच संपूर्ण ताकदी निशी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन अनुप शहा यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित मठपती, रमेश मठपती, छाया मठपती, संगीता भोसले, आसमा शेख, रसिका भोजने, पल्लवी भोजने यांनी विशेष परिश्रम घेतले.