दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | फलटण |
राज्य महसूल विभागाच्या माध्यमातून ‘उमंग’ अॅपवर आता डिजिटल ७/१२ उपलध करून देण्यात आलेला आहे. यासोबतच ऑनलाईन ७/१२ पडताळणी साठी सुद्धा यामध्ये विशेष सुविधा दिली आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
याबाबत माहिती देताना उपविभागीय अधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले की, विविध सरकारी सेवांचा लाभ घेणे सुलभ होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१७ मध्ये यूनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स हे युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले. या उमंग अॅपद्वारे १९८७ प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी वापरू शकता. हे अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पीएफ, डिजीलॉकर, एनपीएस, गॅस सिलेंडर बुकिंग करणे, नवीन पॅनकार्ड मिळविणे किंवा पाणी व वीजबिल जमा करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. या अॅपवर वेळोवेळी अनेक प्रकारच्या सेवा जोडल्या जात आहेत.
हे अॅप अँड्रॉइड फोन युजर्स हे ‘प्ले स्टोअर’ वरून तर आयफोन युजर्स हे ‘अॅपल स्टोअर’वरून डाउनलोड करू शकतात. तसेच युजर्स ९७१८३९७१८३ वर मिस कॉल करून या अॅपची लिंक मिळवू शकतात. याव्यतिरिक्त https://web.umang.gov.in पण हे अॅप डाउनलोड करण्यासाठी रिडायरेक्ट करते, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.