किल्ले सज्जनगड परिसरात मद्यपींचा धिंगाणा; राजरोस पार्ट्यांचे नियोजन


स्थैर्य, सातारा, दि.१९ : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून ‘सज्जनगड’ किल्ला ओळखला जातो. आज देखील इतिहासाच्या पाऊल खुणा याठिकाणी पहायला मिळतात. मात्र, शहरातील दररोजच्या आयुष्याला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्याच्या मानसिकतेमुळे सज्जनगड परिसरात (पायरीमार्ग) मद्यपींचा राजरोसपणे वावर  वाढताना दिसत आहे, तरी पोलिसांनी सज्जनगडसारख्या पवित्र अशा ठिकाणी मद्य प्राशन केले जाणार नाही, याची दक्षता घेण्याची तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमींनी केली आहे.

परळी खोऱ्यातील निसर्ग संपदेमुळे शहरातील रटाळ आयुष्य जगणारे नागरिक हे या भागात फिरण्यास, तसेच पार्टीच्या नियोजनानेच दाखल होत असतात. मात्र, निसर्गाचा आनंद घेत असताना ऐतिहासिक जागेचे भान ही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. तसेच पोलिसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासिक वास्तूची अवहेलना होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती येथील दुर्गप्रेमी, तसेच स्थानिक नागरिक करत आहेत.

पार्टी बहाद्दरांमुळे परिसरात दारु बाटल्यांचा खच  

सज्जनगड पायरी मार्ग हा कमी वर्दळीचा अन् निवांत, त्यामुळे मित्रमंडळी गोळा करुन शहरातून पार्सल घेऊन या परिसरात पार्ट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मद्यप्राशनकरुन बाटल्या इतरत्र टाकणे, तसेच खाण्यास घेवून गेलेल्या खाद्य पदार्थांचे कागद ही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या अन् कचरा दिसून येत आहे. यावरती त्वरित निर्बंध लादणे देखील तितकेच महत्वाचे आहे, अन्यथा ह्या परिसरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!