स्थैर्य, करमाळा, दि.२०: करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यास वन विभागाला यश आले आहे. शार्प शूटर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांनी बिबट्याच्या मस्तकावर गोळी घातली आहे.
धनलसिंह मोहिते- पाटील हे गेल्या चार दिवसांपासून या बिबट्याच्या मागावर होते. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सहा वाजता या नरभक्षक बिबट्यास गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. वांगी नंबर चार येथील राखोंडे वस्तीवरील पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत या बिबट्याला 20 ते 25 फुटांवरून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या वेळी त्यांच्याबरोबर बिटरगावचे महेंद्र पाटील, नागनाथ मंगवडे उपस्थित होते.
या बिबट्याने करमाळा तालुक्यात मोठी दहशत घातली होती. तालुक्यातील तीन जणांचे बळी या बिबट्याने घेतले होते. 3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील कल्याण देविदास फुंदे, 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे, 7 डिसेंबर रोजी चिखलठाण येथील फुलाबाई अरचंद कोटली ही ऊस तोडणी कामगाराची आठ वर्षांची मुलगी यांच्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून तिघांचाही बळी घेतला होता. तसेच बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक गाई, म्हशी, शेळी, बैल, कुत्रा आदी पाळीव प्राण्यांवरही हल्ले करून ठार केले होते. त्यामुळे करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नरभक्षक बिबट्यास मारण्यासाठी शार्पशूटर बोलाण्यात आले होते.
बिबट्याला ठार मारण्यात आलेल्या शार्पशूटरच्या पथकामध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांचा समावेश होता. बिबट्याच्या पोस्टमार्टेमसाठी सोलापूर येथे नेण्यात येणार आहे.