स्थैर्य, मायानी, दि. 25 : मायणी येथील अखिल भारतीय आध्यात्मिक व बालविकास केंद्र (दिंडोरी प्रणित) सेवा केंद्र यांच्या पुढाकाराने जगात पसरलेल्या करोना सारख्या महामारीतून देशाची मुक्तता व्हावी यासाठी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने श्री स्वामी समर्थ जपाचा संकल्प सेवेकर्यांनी करीत एका दिवसात तब्बल 718524 ( सात लक्ष अठरा हजार पाचशे चोवीस ) एवढा मंत्र जाप केला.
सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लोकांनी देवाकडे प्रार्थना करणे सुरू केले आहे. जरी बंद झाली देवळे तरी लोकांची श्रद्धा कमी झाली नाही. कदाचित याच श्रध्येमुळे मिळालेल्या आत्मविश्वासाने 125 कोटी लोकसंख्येच्या देशात कोरोना विरुद्धच्या लढ्यात पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना योध्यानी आजवर करोनाला थोपवून धरले आहेत. यात अनेक योध्यानी आपले बलिदानही देशासाठी समर्पण केले आहे. जगातील प्रत्येक देशात या महामारीतून मुक्तता होण्यासाठी व रोज हजारो संख्येने या आजाराला बळी पडणार्या लोकांना शांती मिळावी यासाठी सर्वत्र लोक श्रध्येने नामस्मरण करत या रोगातून जगाला मुक्त करावे अशी प्रार्थना करताना दिसत आहेत.
याच संकल्पनेतून प्रेरित होऊन स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने शुक्रवारी सव्वा लक्ष स्वामी समर्थ जपाचा संकल्प सर्व सेवेकर्यांनी केला. सध्या केंद्रामध्ये एकत्र येता येत नसल्याने सेवेकर्यांना या संकल्पाची माहिती मोबाईलवरून देण्यात आली. यास मायणीसह जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात असणार्या 145 स्वामी समर्थ भक्तांनी यात सहभाग घेऊन शुक्रवारी एकाच दिवशी प्रत्येक सेवेकर्याने आपल्या घरी ही सेवा पूर्ण केली. सेवेकर्यांनी केलेल्या सव्वा लाख जपापेक्षा अनेक पटीने जास्त स्वामींचे नामस्मरण करून तब्बल 718524 ( सात लक्ष अठरा हजार पाचशे चोवीस ) एवढा जप स्वामी भक्तांनी पूर्ण केला.