निधीअभावी साता-यात तब्बल 600 कोटींचे विकासकाम ठप्प


 

स्थैर्य,सातारा, दि ९ : कोरोना काळात निधीमुळे रखडलेली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे आता सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच आचारसंहिता लागू झाल्याने आणखी महिना दोन तीन महिने तरी रस्त्यांची कामे होण्याची शक्‍यता नाही. शासनाकडे निधीची कमतरता असल्याने मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया न झाल्याने कामे होऊ शकलेली नाहीत. जिल्ह्यातील बांधकाम विभागाकडील रस्त्यांची तब्बल 600 कोटींची कामे थांबली आहेत. आता शासनाकडे निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांची टेंडर प्रक्रिया होणार आहे. सध्या केवळ रस्त्यांवरील खड्डे भरण्याचीच कामे होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला खडबडीत रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागणार आहे.

मार्चमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे देशभर लॉकडाउन झाले. परिणामी सर्वच विभागांची विकासकामे थांबली. जिल्ह्यात सर्वाधिक फटका बांधकाम विभागाच्या कामांना बसला. मार्चमध्ये 600 कोटींची रस्त्यांची कामे बांधकाम विभागाने मंजूर केली होती; पण कोरोनाचा लॉकडाउन सुरू झाल्याने या कामांची टेंडर प्रक्रियाच झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. आता कोरोनाचे लॉकडाउन शिथिल होत असतानाच पावसाळ्यात खराब झालेले रस्ते दुुरुस्त होतील, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याने रस्त्यांच्या मंजूर कामांना हात लागणार नाही. त्यातच आता पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आणखी महिनाभर तरी कामे थांबणार आहेत.

बांधकाम विभागाने पूर्वी मंजूर करून निधी उपलब्ध झालेली अपूर्ण कामे पूर्ण करता येणार आहेत; पण सध्या दुरवस्था झालेल्या रस्त्यांना आता पुढील वर्षीच डांबर मिळणार आहे. सध्या केवळ रस्त्यांवरील खड्डेच भरले जाणार आहेत. त्यामुळे सातारकरांना सुसाट वेगाने वाहने चालविता येणार नाहीत. आहे या खडबडीत रस्त्यानेच प्रवास करावा लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील सुमारे 600 कोटींची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत; पण शासनाकडे निधीची कमतरता असल्याने हा निधी मिळत नाही, तोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तींची व नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार नाहीत; पण काही ठेकेदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर काही रस्त्यांची कामे सुरू ठेवली आहेत; पण त्यांना निधी वेळेत मिळेल याची गॅरंटीही नाही. 

निधीसाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुराव्याची गरज… 

पावसाळ्यात खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री व आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. सध्या कोरोनाकडे सर्व निधी वळविण्यात आल्याने शासनाकडे पुरेसा निधी नाही; पण काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरी काही तरी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा होणे आवश्‍यक आहे. अन्यथा खराब रस्त्यांमुळे अपघाताची व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!