पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । सातारा । पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तापोळा आणि बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली – दरे पुलाचे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
   तापोळा, ता. महाबळेश्वर येथे तापोळा – महाबळेश्वर रस्त्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री शंभूराज देसाई,  खासदार श्रीकांत शिंदे,  खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी उपस्थित होते.
     तापोळा ते महाबळेश्वर रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणी येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अडचणीमुळे काही पर्यटक तापोळा भागात येणे टाळत होते. पण आता हा रस्ता रुंद आणि मजबूत करण्यात येत आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक तापोळा भागात येईल. या रस्त्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत असल्याचा मला आनंद आहे. लोकांनी ही पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसाय वाढवावा. तापोळा, बामणोलीचा हा परिसर निसर्ग संपन्न आहे. याचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी ९०० कोटींचा निधी
तापोळा, बामणोली परिसराच्या विकासासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून बामणोली दरे पुल, आपटी तापोळा पुल, आहेरी तापोळा पुल यासह विविध रस्ते विकासाची कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल असा या परिसराचा विकास होणार आहे. या दुर्गम भागातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही असा या परिसराचा विकास  केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
      महाबळेश्वर तापोळा या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण यासाठी ७५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

Back to top button
Don`t copy text!