दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । नाशिक । देश चालविण्यासाठी संताचे आशिर्वाद फार मोलाचे आहेत. भारतीय संस्कृती टिकविण्याचे काम भगवान चक्रधर स्वामींनी केले आहे. चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाद्वारे सर्वधर्म – समतेचा संदेश व एकसंघ होवून काम केल्यास देशाला वैभव नक्कीच प्राप्त होईल, असा संदेश दिला. जगाला अंहिसा परमधर्माची शिकवण देणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळ असलेल्या गुजरात येथील भरुचचा विकास आयोध्या व काशी विश्वनाथच्या धर्तीवर करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.
चक्रधर स्वामी अष्टशताद्बी जन्मोत्सावानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन डोंगरे वसतीगृह मैदानावर करण्यात आले आहे. या संमेलानाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गुजरात राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री जितूभाई चौधरी, आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुनिल भुसारा, माजी आमदार बाळासाहेब सानप, आचार्य उपाध्याय कुळाचार्य बीडकरबाबा, पारिमांडल्य कुळाचार्य आचार्य प्रवर लासुरकर बाबा, कविश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर खामनीकर बाबा, आचार्य प्रवर परमपूज्य महंत सुकणेकर बाबा शास्त्री, कारंजेकर बाबा, धर्मजागरणचे राष्ट्रीय संयोजक शरद ढोले, संमेलन स्वागत समितीचे सदस्य दिनकर पाटील, दत्ता गायकवाड यांच्यासह संत, महंत, तपस्विनी, पुजारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कराड पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थळ गुजरात येथील भरुच येथे आहे. महानुभवी पंथीयांना तेथे जाण्याची व्यवस्था गुजरात शासनाशी चर्चा करुन लवकरात लवकर करण्यात येईल. तसेच बुलडाणा येथील जाळीच्या देवाची सरकारी पूजा व्हावी, महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ व्हावे, या मागण्यांचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.भारत देशाला सोनेकी चिडिया म्हणून संबोधले जात होते. या सोन्यासारख्या देशावर मुघलांचे, इंग्रजांचे अतिक्रमण झाले, त्यावेळी साधू संत यांनी खूप महत्वाची भूमिका निभावून आपला
धर्म आणि संस्कृती टिकविली. यात महत्वाची भूमिका चक्रधर स्वामींची होती. वेगवेगळ्या बोली भाषेत ग्रंथ लिहून आपल्या धर्म, संस्कृतीचा त्यांनी प्रसार केला असल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.
गुजरातचे जलसंपदा राज्यमंत्री जितूभाई चौधरी यांनी गुजरात राज्यातील भरुच येथील श्री. चक्रधर स्वामींच्या जन्मस्थळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी दिले.