
दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लब च्या कार्यालयाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञाताने बुधवारी पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार केला. कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली असून लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात कार्यालयातील सर्व रजिस्टर जळून खाक झाले असून इतर साहित्य देखील जाळले आहे. आतील लाईटचा मीटर तोडला असून क्लब समोरील सर्व बोर्ड उपसून शिवसागर जलाशयाच्या पाण्यात फेकून दिले आहेत. या प्रकारात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा निषेध बोट चालकांनी केला असून तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करावी, त्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत बोटच्या चालकांनी या घटनेबाबत अज्ञाताविरोधात मेढा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बोट चालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता
गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या विश्रांतीनंतर नुकताच बोट क्लब सुरू झाला होता. यातच अशी घटना घडल्यामुळे; बोट क्लब बंद राहिला तर तब्बल १०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे बोट चालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.