
स्थैर्य, सातारा, दि. १३ : सातार्यात करोनाचे वाढते बाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पाहता खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने शुक्रवारपासून जिल्ह्यात सर्वत्र हाफ लॉकडाउन घोषित केले असले तरी याबाबत जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली, रविवारी मंगळवार तळे रस्ता तसेच जुन्या भाजी मंडईत सुरू असलेली खुलेआम भाजीविक्री सातारकरांना मंडईचा सोस सुटता सुटेना असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरम्यान, याकडे पोलीस प्रशासन व सातारा नगरपलिकेचे होत असलेले दुर्लक्ष भाजीविक्रेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्ह्यात करोनाचे थैमान वाढले असून यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी कडक पावले उचलण्याचा इशारा वारंवार देवूनही नागरिकांची मनमानी सुरूच होती. शहरातील काही सामाजिक संघटनांनी याबाबत वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे, विनाकारण न फिरण्याचे आवाहन केले होते. मात्र या सर्वाला हरताळ फासत बहुतांशी सातारकर स्वैरपणे वागत असल्याचे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शुक्रवारपासून शहरात सर्व दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार असल्याचे तसेच लग्न, अंत्यसंस्कार या कार्यक्रमाला कमीत कमी नागरिकांनी सहभागी होण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, शुक्रवारी पहिल्या दिवशी दोन वाजता दुकाने बंदही झाली होती. मात्र, मंडईत काही भाजीविक्रेते खुलेआम भाजी विक्री करत होते. आज रविवारी आठवड्याचा बाजारचा दिवस असला तरी मंडई बंदचा आदेश असल्याने भाजी विक्रेते शहरात भाजी विक्री करण्याचा प्रयत्न करणार नाहीत असे वाटत असताना सकाळपासूनच मंगळवार तळे रस्त्याच्या दुर्तफा भाजी विक्रेत्यांनी चांगलीच गर्दी केल्याचे दिसत होते तसेच जुन्या भाजी मंडई परिसरातही अनेक भाजी विक्रेते खुलेआम भाजी विक्री करत होते.यावेळी कोणाकडूनही सोशल डिस्टन्िंसग पाळले जात नसल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत होते. एकही पोलीस कर्मचारी अथवा पालिकेचा कर्मचारी या भाजीविक्रेत्यांना अगर नागरिकांना हटकताना दिसत नव्हता.