ना. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात श्रीमंत रामराजेंची लोकसभेसाठी साखरपेरणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 18 जानेवारी 2023 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे काल फलटण दौऱ्यावर होते. विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी ना. देवेंद्र फडणवीस हे फलटण येथे आलेले होते. दौरा ना. देवेंद्र फडणवीस यांचा होता; पण त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची साखरपेरणी केली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

काळज येथे निरा देवधर कालव्याच्या भूमिपूजन समारंभासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे दाखल झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काळज येथे जाऊन ना. फडणवीस यांची भेट घेत फलटणचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये येण्याचे निमंत्रण दिले व ना. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते मान्य करत काळज येथील कार्यक्रम झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देऊन फलटण येथील श्रीराम मंदिरामध्ये ते आले श्रीराम मंदिरामध्ये येताना उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे सारथ्य हे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले होते.

उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा दौरा संपल्यानंतर राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थेट श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथे भेट घेतल्याने विविध चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांमधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रबळ दावेदार आहेत. परंतु राज्यामध्ये झालेल्या महायुतीमुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडे आहे. सातारा लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. या सर्व गोष्टींचा विचार करता सातारा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे व माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडे येणार का ? अशा चर्चा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गतकाही दिवसांपूर्वी अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेत आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक असा इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!