अमर शेंडे लिखित नाना शंकरशेट यांच्यावरील चरित्राचे आज प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | फलटण (जि.सातारा) येथील युवा लेखक व चरित्र अभ्यासक अमर शेंडे लिखित ‘आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट’ या चरित्राचे प्रकाशन आज शुक्रवार, दि.19 जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठामध्ये संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या महाराष्ट्राचे शिल्पकार या ग्रंथमाले अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या चरित्राचा प्रकाशन समारंभाचे आयोजन मुंबई विद्यापीठ व साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने करण्यात आले असून हा समारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.19 रोजी दुपारी 3 वा. मुंबई विद्यापीठाच्या सर फिरोजशहा मेहता व्यवस्थापन परिषद दालन, फोर्ट, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यावेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, ना.नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्राचार्य डॉ.अजय भामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

180 वर्षांपूर्वी च्या तत्कालीन मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, धार्मिक, व्यावसायिक जडणघडणीमध्ये अग्रेसर असणार्‍या नानांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती सांगणार्‍या व अभ्यासकांना उपयुक्त ठरणार्‍या या चरित्राच्या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने चरित्र अभ्यासक, साहित्यिक, लेखक व नाना प्रेमी यांना करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!