फलटण शहरासह तालुक्यात डेंग्यूची लागण; प्रशासन सुस्त

तोकड्या उपाययोजनांद्वारे डेंग्यू रोखणे कठीण


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२४ | फलटण | प्रसन्न रुद्रभटे |
फलटण शहरासह तालुक्यात डेंग्यूची लागण होऊन तब्बल महिना उलटला, परंतु पालिका व आरोग्य विभागाचे अधिकारी पदाधिकारी अद्याप जागचे हललेदेखील नाहीत. धूर, औषध फवारणी सुरू असल्याचा कांगावा प्रशासन करत आहे; परंतु या तोकड्या उपाययोजनांद्वारे डेंग्यू रोखणे कठीण आहे.

एकाही अधिकारी, पदाधिकार्‍याला डेंग्यूच्या गंभीर प्रश्नाचे देणे-घेणे नाही. आरोग्य विभागाची बैठक घेण्यासही वेळ नाही. शहरासह तालुक्यात आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागाच्या जिल्हा हिवताप विभागामार्फत डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. असे नमुने पाठविण्यात आले होते, मात्र त्यात काहीच स्पष्ट झाले नाही. फलटण शहरात अनेक रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले, त्या भागात प्राधान्याने धूर फवारणी, किटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याचा दावा प्रशासन करत आहे, मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांचा हा दावा फोल ठरत आहे.

सध्या शहरात डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. खाजगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या निश्चितच जास्त आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असताना अधिकारी, पदाधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. डेंग्यू रोखण्यासाठी अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना न केल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील कोळकी, साखरवाडी या परिसरात शेकडो जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खाजगी रुग्णालयातील रॅपिड चाचणीनुसार शहरात व तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण आहेत.

उपाययोजना सुरू असून ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात प्राधान्याने धूर, औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी स्वत:चे घर व परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. आमच्या उपाययोजना सुरू आहेत. तथापि, नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी घ्या काळजी :

  • ‘एडीस’ नावाचा डास चावल्याने होतो डेंग्यू
  • एडीस डास दिवसा चावतो
  • स्वच्छ साठलेल्या पाण्यात आढळतो एडीस
  • घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा
  • आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळा
  • पाण्याचे साठे पूर्णपणे कोरडे करा
  • निरुपयोगी वस्तू घर, परिसरात ठेवू नका
  • खिडक्यांना जाळ्या बसवा
  • मच्छरदाणी, डास प्रतिबंधक औषधे वापरा


Back to top button
Don`t copy text!