
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | दापोली |
दापोलीमधील आगवे गावात आंबा कलम बागेत कल्टार (पॅक्लोबुट्राझोल) या संजीवकाचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि महाविद्यायाच्या कृषीरत्न गटाच्या विद्यार्थ्यांनी आगवे येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पॅक्लोबुट्राझोलचा वापर प्रात्यक्षिकरित्या दाखविण्यात आला.
हापूस जातीच्या झाडांना वर्षाआड किंवा अनियमित फलधारणा होत असल्याने शेतकर्यांना दरवर्षी उत्पन्न मिळत नाही. या अनुवंशिक समस्येवर संशोधन करताना पॅक्लोब्युट्रॉझॉल हे वाढ निरोधक संजीवक उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या संजीवकाच्या वापरामुळे झाडांमध्ये ’जिब्रेलीन्स’ या वाढ उत्तेजकाच्या निर्मितीत व्यत्यय येऊन अवाजवी शाखीय वाढ कमी होते आणि नियमित मोहोर येऊन फलधारणा होण्यास मदत होते. पॅक्लोब्युट्रॉझॉल वर्षातून एकदा १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान पूर्ण वाढलेल्या द्यावयाचे असते. पॅक्लोब्युट्रॉझॉल झाडाच्या आकारमानानुसार द्यावे. प्रत्येक झाडाचा पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून त्याला ३ ने गुणाकार करून पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे. ते २३ टक्के पॅक्लोब्युट्रॉझॉल घटक असलेले रसायनातून कल्टार द्यावे. पॅक्लोब्युट्रॉझॉलची आवश्यक मात्रा ३ ते ६ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती द्यावी. झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खणती किंवा कुदळीने १० ते १२ सें. मी. खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे मारून किंवा कुदळीच्या सहाय्याने रिंग मारून त्यात पॅक्लोब्युट्रॉझॉलचे तयार केलेले द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावेत. हे द्रावण मोठ्या पावसात देऊ नये. पॅक्लोब्युट्रॉझॉल देण्यापूर्वी व नंतर झाडाभोवती असलेले सर्व तण काढून टाकावे. पॅक्लोब्युट्रॉझॉल संजीवक दिलेल्या झाडांना सुमारे तीन-चार महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होते माहिती देत असतानांच शेतकर्यांना प्रात्यक्षिकही करून दाखवले.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, लांजाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण व ग्रामीण जागृती कर्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. जे. दुबळे व विषयतज्ज्ञ डॉ. एम. एम. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषीरत्न या गटाच्या प्रणय नार्वेकर, साहिल कांबळे, विनित फोलकर, प्रतिक नाईक, विशाल सोनवणे, सूरज इतकर, पवन केसरकर, वेद तेंडुलकर, एम. तल्हा, सौरभ शेडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.