दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
कोळकी तलाठी कार्यालय हे तलाठी बदलला की बदलत असते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यासाठी हे कोळकीचे तलाठी कार्यालय कायमस्वरूपी एका जागी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पूर्वी तलाठी ऑफिस हे कोळकी ग्रामपंचायतीच्या आवारात होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोईचे; होते परंतु नंतर तेथून तलाठी कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर विविध खाजगी ठिकाणी तलाठी कार्यालय सुरू आहे. आतासुद्धा गावाच्या एका टोकाला तलाठी कार्यालय सुरू आहे.
कोळकीला तलाठी कार्यालयाचा प्रस्ताव हा दाखल असून या ठिकाणी अद्यापही तलाठी कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्यावर निधी प्राप्त झाला नाही. फलटण शहराचे उपनगर व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणार्या कोळकी गावाची ही अवस्था आहे.
कोळकी गावाचे सर्कल ऑफिस सुद्धा खाजगी जागेमध्ये सुरू आहे. तलाठी व सर्कल ऑफिस हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नजीक सुरू होणे गरजेचे आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे ‘गाव’ म्हणून कोळकी गावाची सातारा जिल्ह्यामध्ये ओळख आहे. त्यांचे मतदान सुद्धा कोळकीमध्येच आहे. श्रीमंत संजीवराजे हे नेहमीच विविध निधी हा कोळकी गावासाठी आणत असतात. त्यामुळे कोळकीचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तरी गावपुढार्यांनी आता पुढाकार घेत कोळकीला कायमस्वरूपी तलाठी ऑफिस कसे होईल, हे बघणे गरजेचे आहे.