श्रीदत्त इंडियाने उसाचा दुसरा हप्ता अंतिम दर रूपये ३४११ प्रमाणे देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) येथील श्रीदत्त इंडिया शुगर प्रा.लि. या साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामात गळीत झालेल्या उसाचा दुसरा हप्ता अंतिम दर रूपये ३४११ प्रमाणे शेतकर्‍यांना ताबडतोब द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात स्वाभिमानी संघटनेने म्हटले आहे की, गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचे अंतिम बिल श्रीदत्त शुगर कारखान्याने रूपये ३४११ प्रती टन ऊस दर शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये दसर्‍यापर्यंत जमा करावी, अशी मागणी दि. १६ ऑटोबर २०२३ रोजी कारखाना प्रशासनाकडे केली होती. तसेच वजनकाटा ऑनलाईन करावा, असे म्हटले होते. त्यानुसार आपल्या कारखान्याने शेतकर्‍यांना प्रती टन रू. १००/- उसाचा दुसरा हप्ता जाहीर केला असून तो शेतकर्‍यांना मान्य नाही. कारखान्याने रू. ३४११/- अंतिम दराप्रमाणे दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा.

श्रीदत्त शुगर कारखान्याने उर्वरित रकम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा न केल्यास माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलनाचा जो आदेश देतील, त्याप्रमाणे आपल्या कारखान्यावर आंदोलन करण्यात येईल. तसेच आपल्या कारखान्याला शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत. या आंदोलनाची सर्व जबाबदारी आपल्या कारखान्यावर व प्रशासनावर राहील, असा इशारा दिला आहे.

हे निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, किरण भोसले, राजेंद्र धनसिंग भोसले, निलेश भोसले, गणेश भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!